Wednesday, December 18, 2019

एका अवलिया "लमाणाचा" रंगभूमीला शेवटचा निरोप...! 🛌

                      (भाग - १) 👇 
     नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्व देणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या "नाटकी" जिवनाला खणखणीत शब्दरूप देत आहेत...एका नाट्यधर्मीची जडणघडण 'लमाण' म्हणजे मालवाहू कामगार...वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या 'नटसम्राट' या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील वाक्य आहे : ''आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे"...रंगमंचावरील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लागूंनी हे तथाकथित लमाणाचे काम विलक्षण निष्ठेने, जिद्दीने व सचोटीने केले आहे... ते नुसतेच श्रेष्ठ नट व दिग्दर्शक नाहीत तर पूर्वीपासून लेखकही आहेत...खरे म्हणजे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात एक अनन्यसाधारण स्थान आहे आणि अथपासून इतिपर्यंत अत्यंत ओघवत्या व वाचनीय शैलीत लिहिलेली 'लमाण' ही आत्मकथा हे सिद्ध करते...
           लागू यांनी पुस्तकाची सुरुवात आपल्या अगदी लहानपणाच्या आठवणींपासून केली आहे...त्यांचे डॉक्टर वडील कॉग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात जाऊन आले होते...श्रीराम लागू स्वत: बी. जे. मेडिकल कॉलेजात गेले ; तेव्हापासून त्यांच्यातला नट प्रथम जागा झाला...भालबा केळकर हे दिग्दर्शक आणि वसंत कानेटकर हे नाटककार तरुणपणीच त्यांच्या संपर्कात आले...कॉलेजच्या वयात केलेल्या इतर कोणत्याही नाटकांपेक्षा कानेटकरांच्या 'वेड्याचं घर उन्हात' या नाटकाने लागूंच्या देदीप्यमान कारकिर्दीचा पाया घातला...हे नाटक नव्याने स्थापन झालेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटीक असोसिएशनचे होते... त्याचे दिग्दर्शन व त्यातील एक प्रमुख भूमिका भालबांचीच होती...
           या पुस्तकात फार महत्त्वाचे स्थान असलेला पहिला नाट्यकर्मी म्हणजे भालबा केळकर...लागू आणि ते जरी बराच काळ सहकारी होते तरी कलावंत म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची विचारधारा या दोहोंत प्रचंड अंतर होते...त्याचा स्फोटक परिणाम अपरिहार्यपणे होऊन कालांतराने या दोघांत फार मोठा असा अंतराय निर्माण झाला...
           'प्रोग्रेसिव्ह' (पी.डी.ए.) नंतरचा लागूंच्या नाट्यप्रवासातला सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे मुंबईची 'रंगायन' ही संस्था, विजया मेहतांसारखी अत्यंत बुद्धिमान, कल्पक आणि कष्टाळू अशी अभिनेत्री व दिग्दर्शिका 'रंगायन' चे नेतृत्व करीत होती...नाटककार विजय तेंडुलकर आणि अभिनेते अरविंद-सुलभा देशपांडे व माधव वाटवे यांच्या कर्तृत्वाने एक भारावलेले वातावरण निर्माण केले होते...काव्य, संगीत, चित्रकला आदी परस्परपोषक अंगांनी ते डवरलेले होते...विजयाबाई आणि लागू यांनी 'इंटिमेट थिएटर'साठी साकारलेली 'मादी' ही तेंडुलकरांची एकांकिका या सगळ्या क्रांतिकारक कालखंडाचे एक महत्त्वाचे प्रतीक होती...पुढे कित्येक वर्षांनी लागूंनी स्वत:ची 'रुपवेध' ही संस्था काढली...तिच्यात 'रंगायन'चाच ध्येयवाद कामी आलेला स्पष्ट दिसत होता...
           
                                                                                                                            (क्रमशः)
धन्यवाद...!  🙏 
                                                              
                                                          ♚ⓒⓢⓝ♚

No comments:

Post a Comment