Wednesday, December 18, 2019

एका अवलिया "लमाणाचा" रंगभूमीला शेवटचा निरोप...! 🛌

                      (भाग - १) 👇 
     नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्व देणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या "नाटकी" जिवनाला खणखणीत शब्दरूप देत आहेत...एका नाट्यधर्मीची जडणघडण 'लमाण' म्हणजे मालवाहू कामगार...वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या 'नटसम्राट' या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील वाक्य आहे : ''आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे"...रंगमंचावरील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लागूंनी हे तथाकथित लमाणाचे काम विलक्षण निष्ठेने, जिद्दीने व सचोटीने केले आहे... ते नुसतेच श्रेष्ठ नट व दिग्दर्शक नाहीत तर पूर्वीपासून लेखकही आहेत...खरे म्हणजे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात एक अनन्यसाधारण स्थान आहे आणि अथपासून इतिपर्यंत अत्यंत ओघवत्या व वाचनीय शैलीत लिहिलेली 'लमाण' ही आत्मकथा हे सिद्ध करते...
           लागू यांनी पुस्तकाची सुरुवात आपल्या अगदी लहानपणाच्या आठवणींपासून केली आहे...त्यांचे डॉक्टर वडील कॉग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात जाऊन आले होते...श्रीराम लागू स्वत: बी. जे. मेडिकल कॉलेजात गेले ; तेव्हापासून त्यांच्यातला नट प्रथम जागा झाला...भालबा केळकर हे दिग्दर्शक आणि वसंत कानेटकर हे नाटककार तरुणपणीच त्यांच्या संपर्कात आले...कॉलेजच्या वयात केलेल्या इतर कोणत्याही नाटकांपेक्षा कानेटकरांच्या 'वेड्याचं घर उन्हात' या नाटकाने लागूंच्या देदीप्यमान कारकिर्दीचा पाया घातला...हे नाटक नव्याने स्थापन झालेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटीक असोसिएशनचे होते... त्याचे दिग्दर्शन व त्यातील एक प्रमुख भूमिका भालबांचीच होती...
           या पुस्तकात फार महत्त्वाचे स्थान असलेला पहिला नाट्यकर्मी म्हणजे भालबा केळकर...लागू आणि ते जरी बराच काळ सहकारी होते तरी कलावंत म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची विचारधारा या दोहोंत प्रचंड अंतर होते...त्याचा स्फोटक परिणाम अपरिहार्यपणे होऊन कालांतराने या दोघांत फार मोठा असा अंतराय निर्माण झाला...
           'प्रोग्रेसिव्ह' (पी.डी.ए.) नंतरचा लागूंच्या नाट्यप्रवासातला सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे मुंबईची 'रंगायन' ही संस्था, विजया मेहतांसारखी अत्यंत बुद्धिमान, कल्पक आणि कष्टाळू अशी अभिनेत्री व दिग्दर्शिका 'रंगायन' चे नेतृत्व करीत होती...नाटककार विजय तेंडुलकर आणि अभिनेते अरविंद-सुलभा देशपांडे व माधव वाटवे यांच्या कर्तृत्वाने एक भारावलेले वातावरण निर्माण केले होते...काव्य, संगीत, चित्रकला आदी परस्परपोषक अंगांनी ते डवरलेले होते...विजयाबाई आणि लागू यांनी 'इंटिमेट थिएटर'साठी साकारलेली 'मादी' ही तेंडुलकरांची एकांकिका या सगळ्या क्रांतिकारक कालखंडाचे एक महत्त्वाचे प्रतीक होती...पुढे कित्येक वर्षांनी लागूंनी स्वत:ची 'रुपवेध' ही संस्था काढली...तिच्यात 'रंगायन'चाच ध्येयवाद कामी आलेला स्पष्ट दिसत होता...
           
                                                                                                                            (क्रमशः)
धन्यवाद...!  🙏 
                                                              
                                                          ♚ⓒⓢⓝ♚

Friday, December 6, 2019

मनाची 'श्रीमंती' ... 💝👑


                                                 
                                                                    (भाग-२) 👇

१ महिन्यानंतर...

          बरोबर १ महिन्याच्या अंतराने ड्रायव्हरच्या मालकाचा वाढदिवस येतो व तो ड्रायव्हर आपल्या मालकाला भेटवस्तू 🎁 घेण्यासाठी पुन्हा त्याच कपड्यांच्या दुकानात जातो...तेथे गेल्यावर तो ड्रायव्हर दुकानदाराला म्हणतो की , ' एखादा चांगला शर्ट दाखवा'... मग दुकानदार शर्ट दाखवायला सुरुवात करतो... पहिल्यांदा तो २५० रु. चा शर्ट दाखवितो... तेव्हा ड्रायव्हर म्हणतो, ' यापेक्षा अजून चांगला (महाग) दाखवा '... त्यानंतर तो दुकानदार ५०० रु. चा शर्ट दाखवितो...तोही शर्ट त्याला आवडत नाही व तो म्हणतो याच्यापेक्षा महाग असला तर बघा ना...मग दुकानदार त्याला १००० रु. चा शर्ट दाखवितो... ड्रायव्हर पुन्हा तेच वाक्य म्हणतो... शेवटी तो दुकानदार त्याला १५०० रु. चा शर्ट दाखवितो...तो शर्ट ड्रायव्हरला खूप आवडतो आणि मनोमन विचार करतो की ' हा शर्ट आपल्या मालकाला सुद्धा आवडेल '... म्हणून ड्रायव्हर तो शर्ट निवडतो आणि  पैसे देऊन तेथून निघायला लागतो...
             पण या घडामोडींमुळे दुकानदाराच्या मनात एक विचारांचं काहूरच उठलं होतं... म्हणून तो ड्रायव्हरला विचारतो की , ' तू तर एवढे महाग कपडे घालत नाहीस '... मग एवढे महाग कपडे कोणासाठी ?... यावर ड्रायव्हर म्हणतो की , आज माझ्या मालकाचा वाढदिवस आहे व ते नेहमी तुमच्याच दुकानातून कपडे घेतात... त्यामुळे म्हटलं येथूनच एखादा शर्ट घ्यावा...👔
             तो ड्रायव्हर तेथून गेल्यावर देखील  दुकानदार त्याच विचारात गुंतला होता...या घटनेतून त्याला एक गोष्ट शिकायला भेटली ती म्हणजे , माणसाचा मोठेपणा हा त्याच्या श्रीमंतीमुळे नाही तर त्याच्या वागण्याच्या पद्धतीमुळे कळतो...त्याच्या विचारांमुळे , संस्कारांमुळे कळतो...
           या कथेतून मला हेच सांगायचं आहे की , ' माणसाची किंमत ही बाहेरील श्रीमंती वरुन कधीच ठरवू नये '...जी माणसं मनाने श्रीमंत असतात तीच माणसं सुख-दु:खात कायम आपल्या सोबत असतात... 😊👍

धन्यवाद...!🙏    

                                                           ♚ⓒⓢⓝ♚
             

Wednesday, December 4, 2019

मनाची 'श्रीमंती' ... 💝👑

                                        
                                                           (भाग - १) 👇
     एक माणूस खूप श्रीमंत असतो...एके दिवशी त्याच्या ड्रायव्हरचा वाढदिवस असतो... तेव्हा ड्रायव्हरला खूष करण्यासाठी त्याला एखादी भेटवस्तू 🎁 द्यावी असा विचार मालकाने केला... लागलीच वाढदिवसाच्या निमित्ताने तो मालक आपल्या ड्रायव्हरला घेऊन एका कपड्यांच्या दुकानात जातो...
            दुकानाजवळ गेल्यावर ' मी ५ मिनिटांत परत येतो ' असं म्हणून मालक ड्रायव्हरला बाहेरच थांबण्याची सूचना करतो... आतमध्ये गेल्यावर तेथील दुकानदाराला विविध शर्ट दाखवण्यास सांगतो... त्याप्रमाणे तो दुकानदार विविध किंमतीचे शर्ट त्या मालकाला दाखवितो... 
           पहिल्यांदा तो दुकानदार १५०० रु. चा शर्ट दाखवितो...पण तो मालक म्हणतो की , ' यापेक्षा अजून कमी (स्वस्त) किंमतीचा शर्ट दाखवा '... दुकानदार १००० रु. चा शर्ट दाखवितो... पुन्हा तो मालक म्हणतो की, ' अजून कमी किंमत '... दुकानदार पुन्हा ५०० रु.चा शर्ट दाखवितो...मालकाचं पुन्हा तेच वाक्य 'अरे बाबा , स्वस्तातल्या स्वस्तात दाखव एखादा '... दुकानदार शेवटी २५० रु. चा शर्ट दाखवितो... मालक तोच शर्ट निवडतो आणि पैसे देऊन तेथून निघायला लागतो... तेवढ्यात दुकानदाराला न राहवून त्याने त्या मालकाला एक प्रश्न विचारतो की, ' साहेब तुम्ही तर एवढे स्वस्त कपडे घालत नाही '...मग हा शर्ट कोणासाठी ?... त्यावर तो मालक उत्तर देतो ...हा शर्ट माझ्यासाठी नाही रे , आज माझ्या ड्रायव्हरचा वाढदिवस आहे ना त्यामुळे घेतला...एवढं बोलून मालक तेथून निघतो आणि बाहेर उभा राहिलेल्या आपल्या ड्रायव्हरला तो शर्ट भेट म्हणून देतो... 👚    
 
(उर्वरित कथा दुसऱ्या भागात...)
धन्यवाद...!🙏      

                                                  ♚ⓒⓢⓝ♚